कबड्डीपटू अल्पवयीन मुलीवर अत्याचार   

पिंपरी : अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील १७ वर्षीय कबड्डीपटू युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन क्रीडा प्रशिक्षकांसह तीन जणांना जेरबंद केले. याप्रकरणी पोलिसांकडून लवकरच न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर करण्यात येणार आहे.अंकुश बबन बेडेकर (वय २४), शिवाजी निवृत्ती वाबळे (वय ५५, दोघेही रा. दहिगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर), रमेश शिवाजी गांगर्डे (वय २६, रा. बहिरोबाची वाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) अशी आरोपींची नावे आहेत. यातील वाबळे आणि गांगर्डे हे क्रीडा प्रशिक्षक आहेत. न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. तर अंकुश जामीनावर आहे. याप्रकरणी पीडित १७ वर्षीय युवतीच्या मामाने पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड पोलिस ठाण्यात २६ फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली आहे.
 
पीडित १७ वर्षीय युवती ही राष्ट्रीय कबड्डीपटू असून चांगले प्रशिक्षण मिळावे, यासाठी तिने भोसरी येथील संस्थेत सराव सुरू केला. त्यासाठी वाकड येथे मामाकडे ती राहायला आली होती. दरम्यान, २५ फेब्रुवारीला ती घरी न परतल्याने तिच्या मामाने पोलिस ठाण्यात धाव घेतली. अल्पवयीन असल्याने तिचे अपहरण झाल्याप्रकरणी २६ फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी याप्रकरणी अंकुशला अटक केली. त्याला जमीन मिळाला आहे.दरम्यान, आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे तिने सांगितले. त्यानुसार वाकड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये ट्रॉसिटी आणि बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी कलम वाढ झाली. त्यानंतर वाबळे आणि गांगर्डे यांनाही अटक झाली. अधिक तपास सुरू असल्याचे सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांनी सांगितले.

Related Articles